दोन अट्टल गुन्हेगारांनी एका किराणा मालाच्या व्यापाऱ्याच्या कारच्या काचेवर ऑइल टाकले. युक्ती वापरून टायर पंक्चर केले व नजर चुकवत कारच्या पाठीमागील सीटवर ठेवलेली सव्वादोन लाख रुपये रोख असलेली बॅग लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री जिन्सी भागातील गजबजलेल्या मदनी चौकात घडली. परिसरातील एका सीसीटीव्ही मध्ये दोन संशयित भामटे कैद झाले आहे.पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
सुमतीलाल बन्सीलाल गुगले (रा.एन ७ सिडको,औरंगाबाद) असे रोकड चोरी गेलेल्या व्यापाऱ्यांचे नाव आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, गुगले यांची जुना मोंढा भागात होलसेल किराणा माल विक्रीची दुकान आहे. बुधवारी दिवसभराची विक्री चे सुमारे सव्वालाख रुपये त्यांनी एका बॅगेत ठेवले. ती बॅग त्यांच्या कारच्या पाठीमागे ठेवली. कारच्या समोरील काचेवर ऑइल टाकण्यात आले होते.अंधारामुळे ते ऑइल न समजल्याने ते पुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र काचेला ऑइल चिटकून राहिले व ते तसेच पुढे निघाले मात्र गुगले थांबत नसल्याचे पाहून चोरट्याने युक्ती वापरात मदिना चौकात त्यांची चारचाकी चे टायर पंक्चर केले. गुगले कारखाली उतरताच चोरट्यानी त्यांची नजर चुकवत कारच्या मागील सीटवर ठेवलेली पैशाची बॅग लंपास केली. हा प्रकार काही वेळाने लक्षात येताच त्यांनी जिन्सी पोलीसाना या बाबत माहिती दिली.उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. व घरावर, हॉटेलवर, स्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही ची पाहणी केली. दरम्यान रात्री उशिरा एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन व्यक्तीची संशयास्पद हालचाल दिसून आली .या दोघांचा शोध सुरू आहे.